औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार क्षमताविकास आवश्यक – जाधव


औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असून त्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करून औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार स्वतःमध्ये कौशल्ये विकसित केली पाहिजेत असे मत जे. ए. सोल्युशन्सचे संस्थापक उद्योजक अलंकार जाधव यांनी व्यक्त केले.
यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये एमसीएच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी एमसीएच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. जयश्री भोसले, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी तुषार शेंडे उपस्थित होते.
जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेली कौशल्ये त्यांच्या कामातून दिसली पाहिजेत. त्यांनी विद्यार्थी दशेमध्ये केलेले विविध प्रकल्प हे कंपनीसाठी उपयुक्त ठरले पाहिजेत. त्याबरोबरच त्या प्रकल्पांचा कंपनीच्या विकासामध्ये वाटा असला पाहिजे. नवीन प्रकल्प तयार करणे आणि त्याच्या माध्यमातून समाजाचा विकास होणे ही कंपनीची गरज असते. त्यामुळे त्या दृष्टीने आवश्यक असलेल्या नवनवीन योजना राबविण्याचे काम त्यांच्या हातून होणे अपेक्षित आहे.
एमसीएच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. जयश्री भोसले म्हणाल्या, यशोदामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे शिक्षण दिले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांना स्वतःचा व्यवसाय आणि नोकरी या दोन्हीमध्ये पारंगत करण्याचे काम पुढील तीन वर्षांमध्ये केले जाईल. नवनवीन सॉप्टवेअर आणि त्याला आवश्यक असलेली साधनसामग्री विकसित करण्याचे कामही ही मुले प्राधान्याने करतील असा विश्वास आहे.
ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. तुषार शेंडे म्हणाले, सर्व विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी यासाठी आमचा कायम प्रयत्न आहे. 100 टक्के प्लेसमेंटची जबाबदारी यशोदा टेक्निकल कॅम्पस घेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा ओघ वाढला आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये सध्या प्रवेश सुरू असताना आमच्याकडे प्लेसमेंटसाठी विविध कंपन्या भेट देत आहेत हेच यशोदाचे वैशिष्ट्य आहे.

कार्यक्रमाला एमसीएचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोमा व्होरा हिने केले तर पायल ओसवाल हिने आभार मानले. 

Comments

Popular posts from this blog

तालुका पोलीस स्टेशन आयोजित वक्तृत्व स्पर्धेत यशोदाच्या विद्यार्थ्यांचे यश

यशोदाची ऐश्वर्या उनकुले युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप वक्तृत्व स्पर्धेत प्रथम