कमिन्स कंपनीकडून यशोदाला सर्वप्रकारचे सहाय्य – राव
प्रथम वर्ष इंजिनअरिंग
विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
व्यावसायिकतेबरोबरच सामाजिक
भान जपणारी कमिन्स कंपनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही मदत करते. त्यामुळे
आर्थिक अडचणीतील पण होतकरू, शिकण्याची इच्छा असलेल्या मुलांना कमिन्स मार्फत
शैक्षणिक मदत केली जाईल. तसेच यशोदामधील मुलांना शिष्यवृत्ती आणि नोकरीसाठी सर्वतोपरी
सहकार्य करू असे आश्वासन टाटा कमिन्स कंपनीच्या व्यवस्थापक अवंती राव यांनी दिले.
यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये
प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता.
त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे,
इंजिनिअरिंगचे सहसंचालक प्रा. डॉ. अनिरुद्ध महात्मे, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट
अधिकारी प्रा. तुषार शेंडे, प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा. डॉ.
प्रियांका काशीद आदी उपस्थित होते.
अंवती राव म्हणाल्या, सध्या
इंजिनिअरिंग क्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. त्याबरोबरच वेगवेगळे बदल होत आहेत
त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार राहिले पाहिजे. बदलते तंत्रज्ञान आणि त्यासाठी
लागणारे ज्ञान विद्यार्थ्यांकडे असले पाहिजे. सतत शिकत राहण्याची तयारी असेल तर
तुम्हाला काही कमी पडणार नाही. कमिन्स सारखी कंपनी उच्चशिक्षणासाठी मदत करत असते.
त्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहित करण्याचे काम करते. यशोदा
इंजनिअरिंगचा कॅम्पस अत्यंत चांगला असून याठिकाणी चांगले विद्यार्थी घडतील.
त्यांच्यामध्ये आवश्यक ते कौशल्य निर्माण करण्यासाठी कमिन्स कंपनीचे सहकार्य लाभेल
असेही त्यांनी सांगितले. तसेच कमिन्स स्कॉलशीपबाबतही माहिती दिली.
प्रा. अजिंक्य सगरे
म्हणाले, कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडविणे हेच यशोदाचे ध्येय आहे. यावर्षीपासून
विद्यार्थ्यांना बी. टेक डिग्री मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
व्हावा या उद्देशाने गेल्या चार दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या स्वागत समारंभाने या कार्यक्रमांची सांगता आणि शिक्षण प्रक्रियेची सुरूवात
होणार आहे. पुढील चारही वर्षे मुलांनी याच उत्साहात विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी
व्हावे.
यावेळी इंजनिअरिंग विभागाचे
सहसंचालक प्रा. डॉ. अनिरुद्ध महात्मे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला इंजिनिअरिंग, डिप्लोमाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. तुषार शेंडे यांनी पाहुण्यांची ओळख करून
दिली. तर प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रियांका काशीद यांनी
आभार मानले.
Comments
Post a Comment